मला आवडलेली पुस्‍तक – बिनभिंतीची उघडी शाळा



मला आवडलेली पुस्‍तक – बिनभिंतीची उघडी शाळा
लेखक- राजा मंगळवेढेकर
शिक्षण, मुलांची दृष्‍टी व्‍यापक बनविणारे, त्‍यांच्‍या जीवनातील शुचिता जोपासणारे व वाढविणारे, अभिरुचीला वळण लावणारे असावे असे आपण मानतो. परंतु शाळा तर आज ठराविक ठशांचेच विद्यार्थी बाहेर पडावेत अशा कारखान्‍यासारख्‍या चालवितो. आता तर कायदा विद्यापीठ व शिक्षणसंस्‍था यानांही उद्योगच मानतो. आपण हे विसरतो की, सोवळे अगर मुकटा नेसून, गंगाजळ शिंपडून आम्‍लेट खाल्‍ले तरी त्‍याचे थालीपीठ होत नसते. शेवटी आस्तिकता माणसे, जनावरे, झाडे यांवरील प्रेम व इतर जीवांशी तादात्‍म्‍य यातच दडलेली आहे हे या पुस्‍तकामुळे उमगेल. आधुनिक शिक्षणाचे अधिष्‍ठान व स्‍वरुप काय असावे हे या पुस्‍तकावरुन समजू शकेल. म्‍हणून हे पुस्‍तक पालक, शिक्षक, शिक्षणतज्ञ यांनी एकदा तरी जरुर वाचलेच पाहिजे.
      आम्‍ही अनेकदा नकळत अपघाताने आईबाप होतो. पालक म्‍हणून घेतो आणि मालकासारखे वागतो. आपला मुलगा आपली कार्बन कॉपी अगर पॉकेट एडिशन व्‍हावा अशी दुष्‍ट इच्‍छा बाळगतो. राजाभाऊनी ह्या आपल्‍या मनोवृत्‍तीचे सुरेख विश्‍लेषण करुन असे सुचविले आहे की, एक बालकवर्ष साजरे करण्‍यापूर्वी किमान पाच पालकवर्षे तरी पाळले पाहिजे.
      मागच्‍या पिढीच्‍या अपु-या आकांक्षा पु-या करण्‍यासाठी नव्‍या पिढीचा जन्‍म होतो. म्‍हणून बालके म्‍हणजे पुढे जाणा-या जीवनाचे प्रतिनिधी होत. पालकानी आपले प्रेम त्‍यांना द्यावे, पण आपल्‍या जीर्ण विचारांच्‍या शृखंला त्‍यांच्‍या पायात अडकविण्‍याचे पाप करु नये. हीच भूमिका बीन भिंतीच्‍या उघड्या शाळेची आहे. संस्‍कार करण्‍याच्‍या नावाखाली आपली सोय बघून मालकी हक्‍क गाजविणारे पालक, शिक्षक मुलांचे बाल्‍य दगडी भिंतीच्‍या इमारतीत नेस्‍तनाबूत करीत असतात.हे आपण विसरतो. याचे सुंदर विवेचन उदाहरणांसहीत या पुस्‍तकात आढळते.

No comments:

Post a Comment

Pages