“मनाचा स्टॉक टेकिंग”
आपल्या मनाचा कोपरान् कोपरा आपण कधी पिंजून
काढत नाही. प्रत्येक दुकानदार आपलं दुकान वर्षातून एकदा ‘स्टॉक टेकिंग’ साठी बंद ठेवतो. माणसानेही
मनाचे सगळे दरवाजे बंद करुन ‘स्टॉक टेकिंग’ करायला हवं. राखेचं आवरण पांघरलेले किती तरी
निखारे सापडतील. एखाद्या प्रसंगाने, व्यक्तीमूळे ती राख उडते आणि त्या निखा-याचा
चटका समोरच्या माणसाला बसतो. आपल्याच तोंडून ते शब्द निसटतात, तेव्हा त्याची धग आपल्यालाही
जाणवल्याशिवाय राहत नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
युध्दाच्या प्रसंगी मन जास्तीत जास्त शांत
ठेवावं लागतं. संघर्ष आणि क्रोध ह्याही वेळेला मन शांत हवं. हे विधान विनोदी वाटेल, पण त्यात एक गर्भितार्थ
आहे. विलक्षण संताप आला की, त्याचा निरीक्षणशक्तीवर परिणाम होतो. हवी असलेली वस्तू समोर असून दिसत
नाही. लहान मुलांना मारताना आपण त्याच्या शरीरावर कुठं हात उगारीत आहोत, ह्याचं भान राहत नाही. डोळे, कान अशी नाजूक इंद्रियं जवळ असलेला मुलांचा गालच जवळचा वाटतो. कारण तेव्हा
स्वत:ला वाकायचेही श्रम घ्यावे लागत नाहीत. काही मुलं एका
कानाने बहिरी झालेली माझ्या ऐकिवात आहे. आपला हात किती लागतो, हे मारणा-या माणसाला कळत नाही. पण निरीक्षण आणि क्रोध एकाच वेळी संभवत
नाही.
आपत्ती
पण अशी यावी की, त्याचाही इतरांना हेवा
वाटावा, व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून
पडू नये. चांगलं दोन हजार फुटांवरुन पडावं. माणूस किती उंचावर पोचला होता, हे तरी जगाला समजेल.
No comments:
Post a Comment